- महापौरांसह महापालिका आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १० मार्च २०२६) :- चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या भाडे व अनामत रक्कम वसुलीत आर्थिक अफरातफर झाल्याचा धक्कादायक प्रकार राज्याच्या अधिवेशना दरम्यान उघडकीस आल्यानंतर प्रेक्षागृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. प्रशासन अधिकारी आणि १५ कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असताना देखील येथील कारभारी त्यातून बोध घेताना दिसून येत नाहीत, हे विशेष.
दरम्यान चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या नाट्यगृहाची व्यवस्था पाहणाऱ्या व्यवस्थापकाच्या मनमर्जी कारभाराचा अनुभव रहाटणीतील न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांना नुकताच आल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाड्याने घेतले होते. नाट्यगृहाचे ऑनलाईन बुकिंग करून संपूर्ण भाडे व अनामत रक्कम नियमानुसार त्यांनी भरली होती. परंतु, राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे कार्यक्रमाच्या दिवशीच निधन झाल्याने शासकीय दुखवटा जाहीर झाल्याने कार्यक्रमाची नियोजित तारीख त्यांना बदलावी लागली होती. दरम्यान कार्यक्रमाच्या दिवशी स्टेजच्या पाठीमागे डिजिटल एलईडी स्क्रीन लावण्याची आवश्यकता होती. याबाबत नाट्यगृहाचे व्यवस्थापक विकास वेताळ यांच्याशी संपर्क साधला. व्यवस्थापकांनी बाहेरील स्क्रीन लावण्यास त्यांना मनाई केली. ‘स्क्रीन आमच्याकडूनच घ्यावी लागेल’, अशी सक्ती करून त्यांच्याकडे अतिरिक्त शुल्काची मागणी केली. तसेच दुसऱ्या दिवशीच्या तारखेसाठीसुद्धा त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. चाबुकस्वार यांनी त्यांना संस्था लहान आहे. अनावश्यक आर्थिक खर्च परवडणारा नाही, अशी विनंती करूनही त्यांनी त्यांचे एकले नाही. अरेरावीची भाषा वापरून कार्यक्रमांच्या आयोजकांशी वाद घातला, असा आरोप चाबुकस्वार यांनी पत्रकात केला आहे.
अरुण चाबुकस्वार यांनी महापालिका आयुक्त, तसेच महापौर यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. तसेच त्यांनी कारवाईची मागणी देखील केली आहे. आता आयुक्त आणि महापौर काय निर्णय घेतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान नाट्यगृहाचे व्यवस्थापक वेताळ यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सदर आरोप फेटाळले आहेत. तसेच सदर घटनेचा अहवाल उपायुक्तांकडे सादर केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.












