- हाॅटेलसह सुक्ष्म, लघु आणि मोठी उद्योगधंदे अडचणीत…
- कच्चा माल महागला, गॅस टंचाईमुळे ७ ते ८ हजार लघुउद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ मार्च २०२६) :- आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या इराण-इस्राईल-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याचा थेट परिणाम भारतातील उद्योगांवर होत असून पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोठा फटका बसत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या युद्धपरिस्थितीमुळे आयात-निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले असून अनेक ठिकाणी कच्चा व पक्का माल बंदरांमध्ये अडकून पडला आहे. अॅल्युमिनियम, कॉपर, ब्रास यांसारख्या धातूंचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
याशिवाय आखाती देशांतून येणाऱ्या इंधनावरही परिणाम झाला असून भारतात येणाऱ्या गॅसचा पुरवठा अनिश्चित झाला आहे. त्यामुळे गॅस दर वाढू लागले असून औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा देखील कमी झाल्याची परिस्थिती आहे. काही ठिकाणी शासनाने औद्योगिक वापरासाठीचा गॅस पुरवठा थांबविल्याने उद्योगांपुढे गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
फॅब्रिकेशन, पावडर कोटिंग आणि सीडी कोटिंग यांसारख्या उद्योगांमध्ये एलपीजी गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र गॅस पुरवठा ठप्प झाल्याने पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील सुमारे ७ ते ८ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांचे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे बेलसरे यांनी सांगितले.
या परिस्थितीचा औद्योगिक उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम होत असून अनेक उद्योजकांना उत्पादन वेळेत पूर्ण करता येत नाही. उत्पादन खर्च वाढल्याने ऑर्डर वेळेत पूर्ण करणेही कठीण झाले आहे. परिणामी लघुउद्योजक आर्थिक संकटात सापडत आहेत.
पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण आणि रांजणगाव औद्योगिक परिसरातील अनेक लघुउद्योजक बजाज, महिंद्रा, थर्मॅक्स यांसारख्या मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे औद्योगिक साखळीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
औद्योगिक गॅस पुरवठ्याच्या समस्येवर केंद्र व राज्य शासनाने तातडीने तोडगा काढून औद्योगिक गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने केली आहे.












