- तब्बल साडेआठ हजार दराने अकराशेपेक्षा अधिक खुर्च्यांची खरेदी..
- एकीकडे बचतीचे आवाहन तर, दुसरीकडे चक्क उधळपट्टी….
संतोष जराड, प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 18 मार्च 2026) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागासह सत्ताधाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यालयीन व्हिजिटर खुर्ची खरेदीच्या निर्णयावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मध्यवर्ती भांडार विभागामार्फत तब्बल 1127 खुर्च्यांची खरेदी करण्यासाठी सुमारे 96 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायीकडून मंजूरी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या खरेदी प्रक्रियेवर करदात्या नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या निविदा प्रक्रियेत एकूण 14 निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या निविदांमध्ये मे. इंद्रनिल टेक्नॉलॉजीज, सांगवी यांचा 8525 रुपये प्रती नग हा दर लघुत्तम असल्याचे सांगण्यात आले. मात्र हा दर अंदाजपत्रकीय दरापेक्षा केवळ -0.29% कमी असल्याचे समोर आले आहे. इतक्या अल्प दरकपातीचा आधार घेत मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचा निर्णय संशयास्पद असल्याची टीका होत आहे.
विशेष म्हणजे, महापालिकेच्या तिजोरीत आर्थिक ताण असताना अशा प्रकारची खर्चिक खरेदी का करण्यात येत आहे, हा सवाल उपस्थित केला जात आहे. बहुतांशी जुन्या खुर्च्या चांगल्या स्थितीत असतानाही नव्याने खरेदीचा घाट घातल्याचा आरोप आहे.
दरम्यान, नव्या नगरसेवकांना मूलभूत कामांसाठी, विशेषतः ड्रेनेजसारख्या आवश्यक प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध होत नसताना, अशा खर्चांना प्राधान्य दिले जात असल्याने नाराजी वाढत आहे. “एकीकडे बचतीचे आवाहन आणि दुसरीकडे अनावश्यक खरेदी,” या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवली आहे.












