- शहरातील नागरिक म्हणतात ‘अनावश्यक खर्चाला आवर घाला’…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२६) :- केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत जनजागृतीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून तब्बल ३८ लाख ३१ हजार ३५६ रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला असून, हा प्रस्ताव सध्या स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
मात्र, एवढ्या मोठ्या खर्चावरून मनपाच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्वच्छता जनजागृती निश्चितच आवश्यक असली, तरी आर्थिक तंगीच्या काळात जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च करणे कितपत योग्य आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, जनजागृतीसाठी रेडिओ माध्यम निवडताना इतर स्वस्त व प्रभावी पर्यायांचा विचार का झाला नाही. सोशल मीडिया, स्थानिक मोहिमा, शाळा-स्तरीय उपक्रम यांसारखी कमी खर्चिक पर्याय उपलब्ध आहेत, त्याचा विचार करून अनावश्यक उधळपट्टीला आवर घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, १८ मार्च रोजी स्थायी समितीची बैठक गणसंख्येअभावी तहकूब झाल्याने हा विषय प्रलंबित आहे. आता २५ मार्च रोजी होणाऱ्या सभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रस्तावात…
या प्रस्तावानुसार रेडिओ सिटी, रेड एफएम, फिव्हर एफएम, बिग एफएम, रेडिओ मिर्ची आणि मिर्ची लव्ह या रेडिओ स्टेशनवरून स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. मे. स्वस्तिक इंडिया या एजन्सीने यासाठी अर्ज सादर करून केंद्र संचार ब्युरोच्या दरपत्रकानुसार ३२.४६ लाख रुपये खर्च तसेच जीएसटीसह एकूण ३८.३१ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे.














