- काय आहेत गुलाबी कक्षाचे फायदे?…
मा अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत ५ शाळांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी ‘गुलाबी कक्ष’ (Pink Room) उभारण्याचा प्रस्ताव सध्या स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
त्यासाठी तब्बल ९ लाख ९५ हजार रुपयांचा खर्च होणार आहे. दरम्यान, १८ मार्च रोजी आयोजित स्थायी समितीची बैठक गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आली होती. त्यामुळे यासह विविध विषयांना स्थायी सभेची मंजुरी प्रलंबित राहिली असून, पुढील सभेत यावर निर्णय होणार आहे.
महापालिकेने यासाठी दरपत्रके मागविली होती. त्यामध्ये किट इंटलेक्ट या ठेकेदाराने सादर केलेला लघुत्तम दर स्वीकृत करण्यात आला असून, संबंधित संस्थेला पुरवठा आदेशही देण्यात आला आहे. आता या खर्चाला कार्योत्तर मान्यता देण्यासाठी हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
काय आहेत गुलाबी कक्षाचे फायदे?…
- मुलींना मासिक पाळीच्या काळात किंवा शारीरिक बदलांबाबत मोकळेपणाने चर्चा करण्यासाठी एक सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे.
- या कक्षात सॅनिटरी नॅपकिन (पॅड्स), हँडवॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था असते. तसेच, वापरलेल्या पॅड्सच्या विल्हेवाटीसाठी ‘इन्सिनेरेटर’ (जाळण्याचे यंत्र) बसवले जाते.
- मुलींना पौष्टिक आहार, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याबद्दल माहिती देण्यासाठी चार्ट्स किंवा पोस्टर्स लावले जातात.
- शाळा सुरू असताना मुलींना कपडे बदलण्यासाठी किंवा थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी स्वतंत्र जागा.
- मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक औषधे आणि साहित्य.
- काही शाळांमध्ये या कक्षाचा वापर शिक्षिकांद्वारे मुलींचे समुपदेशन करण्यासाठीही केला जातो.
- हा कक्ष योग, पीटी किंवा इतर शारीरिक हालचालींसाठीही वापरला जाऊ शकतो.
महत्त्व…
- योग्य सुविधा मिळाल्यामुळे मासिक पाळीच्या काळात मुलींच्या शाळेतील अनुपस्थितीचे प्रमाण कमी होते.
- शारीरिक बदलांबाबत योग्य माहिती मिळाल्याने मुलींचा आत्मविश्वास वाढतो.
- लहानपणापासूनच स्वच्छतेच्या सवयी लागण्यास मदत होते.








