न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली “ज्येष्ठानुबंध” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अॅपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पोलीस सेवा तसेच त्यांच्या वैयक्तिक अडचणींसाठी तात्काळ मदत मिळत आहे. आतापर्यंत सुमारे २८ हजारांहून अधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून पोलीस अधिकारी व कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी किंवा वृद्धाश्रमात भेट देऊन त्यांचे वाढदिवस साजरे करत आहेत. नुकतेच सुशीला गुलार्णी, पद्मा सरपोद्दार आणि नयन पानसरे यांचे वाढदिवस उत्साहात साजरे करण्यात आले.
या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून, त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अधिकाधिक नागरिकांनी “ज्येष्ठानुबंध” अॅपचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








