न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सध्या अध्यक्षपदाची साठमारी सुरु आहे. त्या पक्षाचा अध्यक्ष होण्यास कोणीही तयार नाही. एक दिवस काँग्रेस नाहीशी होणार आहे. काँग्रेसने परिवारीची पार्टी बनविली होती. मात्र भाजपाने पार्टीचा परिवार आणि संघ तयार केला आहे, असे उद्गार केंद्रीय मंत्री व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी काढले.
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्याच्या वतीने आज सोमवार (दि. १०) रोजी संत तुकारामनगर मधील आचार्य अत्रे सभागृहात केंद्रीय मंत्री व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच नवनिर्वाचित खासदार गिरीष बापट यांचा जाहीर सत्कार तसेच भारतीय जनता पक्षाच्या पक्ष कार्यालयाचे ई-उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दानवे बोलत होते.

याप्रसंगी खासदार गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, महापौर राहूल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, प्राधिकणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित गोरखे, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
दानवे पुढे बोलताना म्हणाले की, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मंत्र्यापेक्षा अधिक किंमत आहे. पक्षाचे काम करीत रहा, कधी कोणाला संधी मिळेल सांगता येत नाही. विधानपरिषदेवर उमेदवार निवडताना विविध जातीधर्मांना (सोशल इंजिनिअरींग) करण्यासाठी संधी दिली. पक्षामध्ये पदे भरपूर आहेत. फक्त प्रामाणिक कार्य़कर्त्यांची पक्षाला गरज आहे. उत्साह ठेवुन काम करा जेवढे कष्ट मोदींजीना पंतप्रधान करण्यासाठी घेतले तेवढेच कष्ट मुख्यमंत्री कऱण्यासाठी घ्या, असे आवाहन दानवे यांनी यावेळी केले.


















