न्युज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि.२७ मार्च २०२६) :- हिंजवडी येथे श्री ग्रामदैवत म्हातोबा देवाच्या यात्रेनिमित्त २ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता पारंपारिक बगाड मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या मिरवणुकीस सुमारे ४० ते ५० हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत हिंजवडी, वाकड व सांगवी परिसरातील अनेक मुख्य मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. टाटा टी चौक ते वाकड नाका, जॉमेट्रीक सर्कल ते वाकड नाका, शिवाजी चौक ते भुमकर चौक, तसेच इंडियन ऑईल चौक परिसरातील मार्ग बंद राहतील.
तसेच वाकड भागात कस्पटे चौक, मानकर चौक, वाकडगाव चौक आदी मार्गांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांगवीतील दत्त मंदिर चौक ते पिंपळे गुरव कमान हा मार्गही बंद राहणार आहे.
नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.














