न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२७ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी येथील फिरंगाई देवी यात्रा व मोशी येथील हनुमान जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
दापोडी येथे ३० व ३१ मार्च रोजी होणाऱ्या यात्रेदरम्यान संविधान चौक ते दापोडी गावठाण, शितळा देवी चौक परिसर तसेच सांगवीकडून आंबेडकर चौकाकडे जाणारे मार्ग बंद राहणार आहेत. या ठिकाणी वाहने हॅरिस ब्रिज, पिंपळे गुरव व फुगेवाडी मार्गे वळविण्यात येणार आहेत.
तसेच २ एप्रिल रोजी मोशी येथे हनुमान जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून पुणे-नाशिक महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक व कुदळेवस्ती परिसरातील मार्गांवर वाहतूक बंद राहील.
या कालावधीत अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वाहनांना बंदी असणार असून नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
















