न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास मंदिरातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रांत संयज तेली यांच्या मार्गदर्शक सुचणेप्रमाणे आळंदी देवस्थानने नुकतेच बैठकीचे आयोजन केले होते. मंदिराचे क्षेत्रफळ आणि सोहळ्यास दिंड्यातून मंदिरात प्रवेश करणारे वारक-यांची संख्या मोठी असल्याने यावर निर्णयासाठी ही बैठक झाली.
आळंदी देवस्थानच्या भक्त निवासात झालेल्या समन्वय बैठकीस पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहा पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, तहसीलदार सुचित्रा आमले, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविन्द्र चौधरी, विवेक लावंड, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी नगरपरिषद अधिक्षक किशोर तरकसे, अशोक राजगुरू आदी सह माऊलींच्या पालखीसोहळ्यातील दिंडी प्रमुख उपस्थित होते.
भाविक, दिंडीकरी यांची संख्या मर्यादित ठेवण्यास पोलीस आणि महसूल प्रशासनाने सुचविले. दिंडीतील संख्या निर्धारित करण्यासाठी प्रशासनाने सुवर्णमध्ये साधण्यासाठी १०० संख्या जास्तीत जास्त असावी. मात्र, यापेक्षा जास्त संख्या असू नये, असा सूर या बैठकीत प्रशासनाकडून निघाला. यामुळेसोहळ्या आधीच गर्दीचा अंदाज येणार असल्याने प्रस्थान सोहळा निर्विघ्न होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली. यावेळी मात्र दिंडी प्रमुखांनी संख्या मर्यादित करण्यातील अडचणी स्पष्ट केल्या. मंदिरात प्रस्थानला प्रवेशाचे पास घेण्यास बैठकीत दिंड्याच्या प्रमुखांनी नकार दर्शविला. पोलिसांनी केलेले पास देण्याचे आवाहन फेटाळून लावले.
या वेळी निर्णय होऊ शकलेला नाही. पुढील बैठकीत सर्वसंमतीने मर्यादा आणण्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वच दिंडी प्रमुख सोहळ्याच्या आधी (दि.२४) रोजी आळंदीत दाखल होणार असल्याने त्यावेळी होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल, आळंदी देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.















