- पालकमंत्री पदासाठी जगताप, भेगडे, लांडगे, कांबळे यापैकी कोणीच लायक नाही?
- भापकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- लोकसभेच्या पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट विक्रमी मतांनी निवडून आले. ते पुणे शहराचे खासदार झाले व संसदेत गेले. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडील पालकमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्थानिक जिल्ह्याचे नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांचा या पदासाठी विचार न करता, थेट त्यांच्या मर्जीतील व विश्वासातील मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती केली. पुणे जिल्ह्यात एकही भाजपचा नेता या पदासाठी लायक नव्हता? मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे पूर्ण पुणे जिल्ह्यातील मतदारांचा अपमान झाला आहे, अशी खरमरीत टीका सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर केली. याबाबत त्यांनी फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली एकहाती सत्ता होती. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे शहरात आठ आमदार पिंपरी चिंचवड शहरात तीन तर जिल्ह्यात १५ आमदार भाजपसेना युतीचे निवडुण आले. लोकसभेत चारपैकी तीन खासदार भाजप सेनेचे निवडूण आले. महापालिका सार्वत्रिक निवडणूकीत आपण पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तांतर घडवा. पिंपरी चिंचवड शहराला मंत्रीमंडळात संधी देतो. असे सुतोवाच आपण केले होते. यामध्ये आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांनी एकत्रित येऊन राष्ट्रवादीचा पाडावा करुन ७७ नगरसेवक कमळ चिन्हांवर निवडूण आणून भाजपाला एक हाती सत्ता मिळून दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजप सेनेचे पुणे व मावळमधून खासदार निवडूण आले.
सन २०१४ विधानसभा निवडणूकीपासून भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, महेश लांडगे यांच्या माध्यमांतून शहराला मंत्रीमंडळात स्थान मिळेल. ही भाजपा आमदार व शहरवासींयाची अपेक्षा होती. जेष्ट नेते आझमभाई पानसरे ह्यांचे राजकीय पुनर्वसन होईल. हे ही अपेक्षित होते. मात्र विधी मंडळाचा कार्यकाल संपत आला तरी या नेत्यांची मंत्रीपदाबाबत पाटी कोरीच राहिली.
लोकसभा २०१९ मावळ मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी हा उपरा उमेदवार आहे. स्थानिक बाहेरचा मुद्दा करीत भाजप सेनेने प्रचार आणि प्रसार केला. निवडणूकीत खासदार श्रीरंग बारणे विजयी झाले. पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला. चिंचवड मतदार संघातून आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रचंड मताधिक्य मिळवून दिले. तर मावळ विधानसभा मतदार संघातून आमदार बाळा भेगडे यांनी ही सेना उमेदावाराला मताधिक्य मिळवून दिले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट पुणे मतदार संघातून खासदार म्हणून निवडूण आले. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप किंवा आमदार बाळा भेगडे यांची पुणे जिल्हा पालकमंत्री म्हणून वर्णी लागेल. अशी आपेक्षा जगताप, भेगडे यांची तसेच शहरवाशियांची होती. मात्र जगताप, भेगडे, लांडगे, कांबळे यांच्यापैकी कोणाचीही पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली नाही. आपल्याला पुणे जिल्ह्यातील १५ पैकी एकही आमदार पालकमंत्री पदासाठी लायक वाटला नाही. म्हणून आपण कोल्हापुरचे चंद्रकांत दादा पाटील यांची पुणे जिल्हा पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. हा सरळ सरळ पुणे जिल्ह्यातील मतदारांचाच अपमान आहे.
आमच्या पुणे जिल्ह्यातील स्वाभिमानी १५ आमदारांनीही यावर भ्र ही न उच्चारता आपली आज्ञा श्रीसावंद मानून गप्प राहणे पसंत केले. ज्याना पार्थ पवार उपरे, बाहेरचे वाटत होते. त्यांनीही कोल्हापुरच्या पाटलांना मान्यता देत. आपल्या आज्ञेचे पालक केले आहे. त्यामुळे आपण आता तरी पुणे जिल्ह्यातील आपल्या या आज्ञाधारक आमदारांपैकी कोणालाही आगामी मंत्रीमंडळ विस्तारात कॅबिनेट किंवा राज्यमंत्री पद द्यावे, असे भापकर यांनी या पत्रात म्हटले आहे.














