- डांगे चौक येथे रिक्षा चालकांचा मेळावा संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ एप्रिल २०२६) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला ‘एक व्यक्ती, एक मत’ हा अधिकार देत समानतेची क्रांती घडवून आणली. आज गरीब नागरिकाच्या मतालाही पंतप्रधानांच्या मताइतकीच किंमत आहे. मात्र, दिवसरात्र कष्ट करणाऱ्या रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि असंघटित कष्टकऱ्यांना समाजात अद्याप हक्काची ‘पत’ (सन्मान व आर्थिक स्थैर्य) मिळालेली नाही. हीच पत मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरू आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केले.
डांगे चौक येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँडच्या वतीने आयोजित आंबेडकर जयंती उत्सव व रिक्षा चालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी डॉ. कांबळे म्हणाले की, देशात ४५ कोटींहून अधिक असंघटित कामगार आहेत. त्यांच्या श्रमाला योग्य किंमत मिळणे आवश्यक आहे. कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना ओळख व सन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मंडळाचे ओळखपत्र मिळाल्यानंतर कष्टकऱ्यांना समाजात प्रतिष्ठा मिळेल. तसेच, म्हातारपणी कष्टकऱ्यांना पेन्शन मिळावी ही आमची प्रमुख मागणी असून, या लढ्यात सर्व ऑटो-टॅक्सी चालक व कष्टकरी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला वाकड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक बापू दत्तात्रय डेरे, हवालदार पोट साहेब, महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष विशाल ससाने, रिक्षा ब्रिगेडचे महाराष्ट्र मुख्य संघटक धनंजय कुदळे, विद्यार्थी वाहतूक विभागाचे अध्यक्ष प्रदीप अय्यर, शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संग्राम शिंदे, मयूर आढगळे, लाजित बागवान, आसिफ शेख, लक्ष्मण ओवाळ, मच्छिंद्र जोगदान, अक्षय गायकवाड, अर्जुन धोत्रे, शुभम कदम, मारुती शितोळे, विजयकुमार सूतकर, अजित शितोळे, बापू कांबळे, सागर लोंढे, विजय जावळे, अमित धुमाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.















