न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- थेरगाव परिसरातील जय भवानी नगर, पाषणकर चाळ येथे विज पुरवठा करणा-या यंत्रणेत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आगीची घटना नुकतीच घडली. त्याबाबत त्वरीत महावितरणच्या कार्यालयास कळविण्यात आले. मात्र नागरिकांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य ऋषीकेश काशिद यांनी नागरिकांच्या सहकार्याने या चाळीमधील नागरिकांना रस्त्यावर आणले. सर्व घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यानंतर महावितरणच्या अधिका-यांना वारंवार संपर्क साधला.
त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. नागरिकांनी रहाटणी येथील अग्निशामक दलाला याबाबत कळवले. अग्निशामक विभागाची गाड़ी दहा मिनिटात घटनास्थळी पोचली. त्याठिकाणी परीस्थितीची पहाणी केली. त्यांच्याकडूनही महावितरणला संपर्क साधला असतानाही त्यांनीही गांभीर्याने घेतले नाही. नंतर पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी पोचले. पोलिसांनी महावितरणच्या अधिका-यांशी संपर्क साधल्यानंतर दीड तासानंतर ते आले. महावितरणने वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे दुर्घटना टळली.
सध्या या चाळीमध्ये नवीन वीज पुरवठा करणारी केबल टाकण्यात आली आहे. मात्र महावितरणकडून अद्यापही कनेक्शन देण्यात आले नाही. त्यामुळे येथील कुटुंबांना अंधारातच रहावे लागणार असल्याचे चित्र आहे.














