- चुकीची शिक्षा की प्रशासनाची कठोरता?..
- पदावनती झालेल्या महिला कर्मचाऱ्याचं समितीला साकडं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याला लिपिक पदावरून थेट ‘मजूर’ पदावर पदावनत करण्यात आल्याचा विषय आता स्थायी समितीपुढे आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्याने ही शिक्षा अत्यंत कठोर असल्याचा दावा करत पुन्हा मूळ लिपिक पदावर नियुक्ती देण्याची विनंती केली आहे.
ब क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड येथे कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी यांनी स्थायी समितीकडे दाखल केलेल्या अपीलमध्ये, त्या आकाशचिन्ह व परवाना विभागात लिपिक म्हणून कार्यरत होत्या. मात्र, त्यांच्या हातून अनावधानाने झालेल्या चुकीमुळे महापालिकेने त्यांना दोन वर्षांसाठी निलंबित केले आणि त्यानंतर लिपिक पदावरून पदावनती करून ‘मजूर’ पदावर नियुक्त केले, असे नमूद केले आहे.
आपल्या अपीलमध्ये त्यांनी “माझ्याकडून झालेली चूक मी मान्य केलेली आहे. मात्र, माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. मला देण्यात आलेली शिक्षा ही चुकीच्या तुलनेत अत्यंत मोठी असून त्यामुळे माझे शैक्षणिक व सेवाविषयक मोठे नुकसान झाले आहे,” असे म्हटले आहे.
तसेच आपण मागास प्रवर्गातील गरीब आणि गरजू महिला असल्याचे नमूद करत “एक वेळ माफ करून मला पुन्हा मूळ लिपिक पदावर नेमणूक द्यावी,” अशी भावनिक विनंतीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे महापालिकेच्या शिस्तभंग कारवाई प्रक्रियेवरही चर्चा सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांकडून चूक झाल्यास कारवाई आवश्यक असली, तरी शिक्षा आणि गुन्ह्याचे स्वरूप यामध्ये समतोल असणे गरजेचे असल्याची भूमिका व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, संबंधित कर्मचाऱ्याने चूक मान्य केलेली असताना आणि त्यामागे आर्थिक अथवा वैयक्तिक गैरफायदा नसल्याचा दावा केला जात असताना थेट पदावनतीसारखी कठोर शिक्षा देण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.













