न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- राज्यभर वाढलेल्या बलात्कारांच्या घटनांच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. १२) रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या आवारात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तसेच पोलिस आयुक्त आर. के. पज्ञनाभान यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मनीषा गटकळ, सुप्रिया पवार, सविता धुमाळ, प्रेमा शेवाळे, आदिती क्षेत्री, अश्विनी पोळ, अनिता गायकवाड, प्रतिभा कंकाळे, निर्मला माने, दिपाली देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील पाच वर्षात महाराष्ट्र राज्यामध्ये बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच नागपूरमध्ये नुकतेच एका चार वर्षीय बालिकेवर नराधमाने बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागपूरचा वासेपुर केला आहे. त्यांना खुर्चीवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यांनी आपला गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे या निवेदनात काळभोर यांनी म्हटले आहे.