- संत तुकारामनगर येथील पुतळा परिसरात स्वच्छता व सुशोभीकरणाची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड ( दि. १६ मे २०२६ ) :- पिंपरीतील संत तुकारामनगर येथील माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुतळ्याच्या परिसरात स्वच्छतेचा अभाव असून जयंती व पुण्यतिथीनिमित्त अर्पण केलेले पुष्पहार महिनोन्महिने तसेच राहतात, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच पुतळ्याजवळील जिना धोकादायक अवस्थेत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस सीमा भिंतीवर यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकिर्दीतील उल्लेखनीय कामगिरी दर्शविणारे म्युरल्स उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागांनी वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत असून, महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या स्मारकाची ही अवस्था दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे.














