- तीन वर्षांनंतर कामावरून कमी करण्याच्या चर्चेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती..
- अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत कार्यरत असलेल्या ट्रॅफिक वॉर्डनमध्ये सध्या असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिका अंतर्गत सैनिक इंटेलिजंट प्रा. लि. कंपनीमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे ५७५ ट्रॅफिक वॉर्डननी आपल्या मागण्यांसंदर्भात महापौर यांना निवेदन सादर केले आहे. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या ट्रॅफिक वॉर्डनना कामावरून कमी करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून ट्रॅफिक वॉर्डन वाहतूक नियमनाचे काम प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. दरवर्षी त्यांची वैद्यकीय तपासणी, शारीरिक चाचणी तसेच पोलीस चारित्र्य पडताळणी केली जाते. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाचा हवाला देत काही सुपरवायझरकडून वारंवार बदली किंवा कामावरून कमी करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
विशेषतः तीन वर्षे पूर्ण झालेल्या ट्रॅफिक वॉर्डनना सेवेतून कमी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात असून, याबाबत महानगरपालिकेशी पत्रव्यवहारही झाल्याचे कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
ट्रॅफिक वॉर्डननी आपल्या निवेदनात वेतन आणि कामाच्या तासांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. सन २०२५ पासून १७ हजार ६०० रुपये इतके वेतन दिले जात असून, वाहतूक विभागाकडून १२ तासांची ड्युटी दिली जाते. याशिवाय शहरातील विविध ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्तासाठीही त्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, या अतिरिक्त कामाचा कोणताही स्वतंत्र मोबदला दिला जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
“आमचे तसेच आमच्या कुटुंबाचे भवितव्य या नोकरीवर अवलंबून आहे. त्यामुळे आमच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला सध्याच्या नियुक्तीच्या ठिकाणीच कर्तव्य देण्यात यावे,” अशी मागणी ट्रॅफिक वॉर्डननी महापौर यांच्याकडे केली आहे. या निवेदनानंतर महानगरपालिका आणि संबंधित कंपनी प्रशासन याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













