न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मे २०२६) :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील संघटनात्मक जिल्ह्यांच्या पुनर्रचनेला मंजुरी देत नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली. संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने “संगठन सृजन अभियान” अंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नरेंद्र रामदास बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवक काँग्रेसपासून त्यांनी पक्ष संघटनेत विविध पदांवर काम केले असून शहरातील सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. मावळ लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव तसेच पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस अध्यक्ष अशी विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे शहर काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.














