न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. बैठकीस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उप आयुक्त संदीप खोत तसेच पोलीस विभाग आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महापालिकेकडून कुर्बानीसाठी निश्चित केलेल्या तात्पुरत्या ठिकाणी पत्राशेड, मंडप, पाणीपुरवठा, मोबाईल टॉयलेट, स्वच्छता कर्मचारी आणि वेस्ट संकलनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुर्बानीनंतर निर्माण होणारा कचरा तात्काळ उचलण्यासाठी विशेष पथके कार्यरत राहणार असून परिसरात स्वच्छता राखण्यावर भर देण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.













