- आरोपींमध्ये पंजाबी गायक सिध्दु मुसेवाला हत्याकांडातील आरोपीचा समावेश..
- पुनावळेतील फर्निचर मॉलच्या मालकावर झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा पर्दाफाश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मे २०२६) :- पुनावळे येथील ए.जे. फर्निचर मॉलच्या मालकावर झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अवघ्या काही दिवसांत छडा लावत बिष्णोई गँगशी संबंधित तीन आरोपींना उत्तराखंडमधील हरिद्वार येथून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी ए.जे. फर्निचरचे भागीदार अशोक कुमार बिष्णोई यांना परदेशी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने १५ मे रोजी रात्री पुनावळे येथील फर्निचर मॉलसमोर बसलेल्या जगदीश बिष्णोई यांच्यावर दोन दुचाकीस्वारांनी पिस्टलमधून पाच ते सहा राऊंड गोळीबार केला. सुदैवाने ते बचावले.
या गंभीर घटनेनंतर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार सात विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी ३५० ते ४०० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला. आरोपी हरियाणातील रोहतक परिसरातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सलग चार दिवस शोधमोहीम राबवली. अखेर हरिद्वार येथे सापळा रचून परवीन रामनिवास, पंकज कुलदीप आणि सागर अजयपाल या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक चौकशीत या आरोपींनी बिष्णोई गँगच्या आरजु बिष्णोई, शुभम लोणकर आणि कुलदीप ऊर्फ कशीष यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे कुलदीप ऊर्फ कशीष हा पंजाबी गायक Sidhu Moosewala यांच्या खून प्रकरणातील आरोपी असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, दिघीतील आणखी एका फर्निचर व्यावसायिकाला देखील बिष्णोई टोळीकडून खंडणीचे फोन आल्याचे उघड झाले असून पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटचा तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.














