न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मे २०२६) :- मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ स्मारकाच्या कामाला आता अधिक गती मिळणार आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
स्मारकाच्या उर्वरित कामासाठी पालिकेतील विविध विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी अतिरिक्त आयुक्त-१ विक्रांत बगाडे यांची स्वतंत्र समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ‘टाईम बाउंड अॅक्शन प्लॅन’ तयार करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही प्रशासनाने दिली.
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून साकारत असलेल्या या शंभूसृष्टी प्रकल्पामध्ये ऐतिहासिक शैलीतील भव्य प्रवेशद्वार उभारण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. हे स्मारक भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
“संभाजी महाराजांचे शौर्य आणि बलिदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे, हीच या स्मारकामागची प्रेरणा आहे,” असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.














