न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २४ मे २०२६) :- थेरगाव येथील जगतापनगर भागात मित्रांसोबत गप्पा मारत उभे असलेल्या एका तरुणावर आणि त्याच्या मित्रांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून परिसरात दहशत माजवणाऱ्या ‘कोयता गँग’च्या दोन गुंडांना काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे, तर त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. हवेमध्ये कोयते फिरवून “आम्ही पिंपरी-चिंचवडचे भाई आहोत, कोणात दम असेल तर समोर या” असे म्हणत त्यांनी परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली होती.
याप्रकरणी सौरभ विलास चौधरी (वय २४, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी गौरव ऊर्फ नन्या गौतम वाघमारे (वय २२) आणि रितेश क्षीरसागर (वय २१, दोघेही रा. आनंदनगर, चिंचवड) यांना अटक केली आहे. त्यांच्या एका अनोळखी साथीदारावरही गुन्हा दाखल झाला आहे.
२१ मे रोजी रात्री ११:३० च्या सुमारास समर्थ क्लिनिकसमोर ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर, हातावर वार करून गंभीर जखमी केले व त्यांच्या मित्रांनाही “मध्ये आलात तर खल्लास करू” अशी धमकी दिली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नलावडे करत आहेत.














