- ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २७ मे २०२६) :-
वाकड परिसरातील कस्पटे चौकाजवळ मुळा नदीवर अर्धवट बांधलेल्या पुलावर बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका इसमाला वाकड पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून २७,४०० रुपये किमतीचे एमडी (मॅफेड्रॉन) पावडर आणि इतर साहित्य असा एकूण ३७,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कमलेश भगवान ससाणे (वय ३५ वर्षे, रा. बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वंदु दत्तात्रय गिरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस कारवाईचा तपशील:
ही कारवाई कस्पटे चौकाजवळ, मुळा नदीवरील अर्धवट तयार ब्रिजवर, वाकड येथे सोमवार, दिनांक २५ मे रोजी सायंकाळी ५:१० वाजेच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांना आरोपीच्या ताब्यात ५.४८ ग्रॅम वजनाची पांढरट मळकट रंगाची एमडी (मॅफेड्रॉन) पावडर (किंमत ₹२७,४००/-), प्लॅस्टिक पिशव्या, चमचा आणि एक मोबाईल फोन असा एकूण ३७,४०० रुपयांचा ऐवज मिळून आला आहे.
आरोपी कमलेश ससाणे हा सदर अंमली पदार्थ कोणतीही परवानगी नसताना, बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी तिथे आला होता. वाकड पोलिसांनी सापळा रचून त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) दराडे करत आहेत.













