न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २७ मे २०२६) :- हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे पनीर हे खरे आहे की ‘चीज अॅनालॉग’, याची स्पष्ट माहिती मेन्यू कार्डवर देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी त्याबाबतचा फलक लावणे आवश्यक असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अनंत देशमुख यांनी दिला.
पिंपरी-चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने मंगळवारी चिंचवड येथे आयोजित जनजागृती बैठकीत ते बोलत होते. मेन्यूमध्ये ‘पनीर’ असा उल्लेख करून प्रत्यक्षात चीज अॅनालॉग वापरल्याचे आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशमुख म्हणाले की, सैल स्वरूपात विकले जाणारे पनीर हे संशयास्पद समजावे. ग्राहकांनी नेहमी पॅकेजिंग असलेले आणि संबंधित डेअरीचे नाव नमूद केलेले पनीरच खरेदी करावे. दुग्धजन्य पदार्थ घेताना छापील बिल घेणेही अत्यावश्यक आहे. तसेच प्रत्येक रेस्टॉरंटच्या बिलावर अन्न परवान्याचा क्रमांक नमूद असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान हॉटेल व्यावसायिकांनी पीपीएलसाठी विविध संस्थांकडून स्वतंत्र परवाने घ्यावे लागत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. याऐवजी एकच परवाना प्रणाली असावी आणि शुल्कही माफक ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी कृत्रिम खाद्यरंगांचा वापर टाळणे, अन्नसुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करणे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करणे, असे आवाहनही अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.














