- २९१ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ मे २०२६) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासनाने 291.52 कोटी रुपयांच्या वीज विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. पावर डिस्ट्रीब्यूशन इनहान्समेंट प्रोग्राम अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार असून भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
चिखली, मोशी, चऱ्होली, दिघी आणि एमआयडीसी परिसरातील भविष्यातील निवासी व औद्योगिक वाढ लक्षात घेऊन हा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत 10 नवीन उपकेंद्रे, 220 किमी उच्चदाब वीजवाहिन्या, 150 किमी लघुदाब वीजवाहिन्या, 100 नवीन रोहित्रे तसेच आधुनिक वीज वितरण सुविधा उभारण्यात येणार आहेत.
या योजनेमुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी होऊन नागरिकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येला सक्षम वीज पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याने भविष्यातील शहरी आणि औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
“भोसरी विधानसभा मतदारसंघातील वेगाने वाढणारी लोकसंख्या, नवीन टाउनशिप, उद्योग आणि निवासी प्रकल्प लक्षात घेता भविष्यासाठी सक्षम वीज पायाभूत सुविधा उभारणे ही काळाची गरज होती. महावितरण प्रशासनाने 291 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यासाठी पावर डिस्ट्रीब्यूशन इनहान्समेंट प्रोग्राम अंतर्गत निविदा प्रक्रियासुद्धा राबविलेली आहे. यामुळे चिखली–मोशी–चऱ्होलीसह संपूर्ण परिसराला मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेमुळे नागरिकांना अधिक दर्जेदार, अखंडित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळेल, तसेच भविष्यातील औद्योगिक व निवासी विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी मतदारसंघाला ‘Future Ready Electricity Infrastructure’ बळकट करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
– महेश लांडगे, आमदार…















