- स्मार्ट सिटी बसथांबा आणि टपरीमुळे पदपथ अडला..
- नागरिकांकडून कारवाईची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- चिंचवडगाव येथील चापेकर चौक ते आकुर्डी दरम्यानच्या पदपथावर पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) कर्मचाऱ्यांसाठी अनधिकृत टपरी उभारण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या टपरीमुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पदपथाचा मूळ उद्देशच धोक्यात आला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, याच ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसथांबा उभारण्यात आला आहे. मात्र बसथांब्यावर प्रवाशांसाठी बसण्याची बाकडी नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एका बाजूला पदपथावर टपरी उभारून जागा अडविली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
“मिळकत कर भरतो कोण आणि त्याचा लाभ घेतो कोण?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि महापालिकेच्या संबंधित विभागाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही होत आहे.
सदर अनधिकृत टपरी हटवून पदपथ नागरिकांसाठी मोकळा करावा तसेच बसथांब्यावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.















