न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व उद्यान विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा शुभारंभ शुक्रवार, ५ जून रोजी सकाळी ७ वाजता दुर्गा देवी टेकडी येथे होणार आहे. अभियानाच्या प्रारंभी वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
‘हरित पिंपरी चिंचवड, स्वच्छ पिंपरी चिंचवड’ या संकल्पनेवर आधारित या अभियानांतर्गत वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शहर अधिक स्वच्छ, हरित आणि शाश्वत करण्यासाठी नागरिक, संस्था आणि विविध घटकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरण संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही या अभियानातून पर्यावरण जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी नागरिकांना वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.














