न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीने ५ जून रोजी निगडी परिसरात सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सायकलस्वार सहभागी होणार असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने विशेष वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ५ जून रोजी सकाळी ५.०० ते सकाळी ९.०० वाजेपर्यंत निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीतील २० प्रमुख मार्गांवर वाहतूक वळविण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर सर्व वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
नागरिकांना आवाहन…
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना या कालावधीत शक्यतो संबंधित मार्ग टाळण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेदरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सायक्लोथॉनमुळे निगडी, आकुर्डी, भक्ती-शक्ती, गंगानगर, आंबेडकर चौक, हुतात्मा चौक, टिळक चौक आणि आसपासच्या भागांतील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडावे, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.















