न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- पुणे जिल्ह्याचे नव्याने नियुक्त झालेले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांची पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा न्यायालयात सदिच्छा भेट घेऊन स्वागत व अभिनंदन केले. यावेळी पिंपरी-चिंचवडमधील न्यायालयीन व्यवस्थेसमोरील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वाढत असलेल्या प्रलंबित प्रकरणांचा मुद्दा उपस्थित केला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) येथे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
नेहरुनगर व मोरवाडी न्यायालयांतील पायाभूत सुविधा, प्रशासकीय अडचणी आणि दैनंदिन कामकाजातील समस्यांबाबतही चर्चा झाली. या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी दिले. तसेच मोशी येथील प्रस्तावित न्यायसंकुलासह संबंधित न्यायालयांची लवकरच पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस ॲड. रीना मगदूम, ॲड. धनंजय कोकणे, ॲड. संकेत सरोदे, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. विकास शर्मा आदी उपस्थित होते.















