- पंढरपूरकडे भक्तीमय वारीला होणार सुरुवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याला यंदा ७ जुलै रोजी श्रीक्षेत्र देहूगाव येथून भक्तिमय वातावरणात प्रारंभ होणार आहे. श्रीक्षेत्र देहू देवस्थान संस्थानने सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
परंपरेनुसार धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि कीर्तनानंतर हजारो वारकरी, दिंड्या व भाविक ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. देहू ते पंढरपूर हा सुमारे तीन आठवड्यांचा प्रवास असून आकुर्डी, पुणे, हडपसर, लोणी काळभोर, यवत, बारामती, इंदापूर, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोली आणि वाखरी मार्गे पालखी २५ जुलै रोजी पंढरपूरात दाखल होणार आहे.
मार्गात विविध ठिकाणी गोल रिंगण, पादुका पूजन, कीर्तन-भजन आणि मुक्कामाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाणी, वैद्यकीय सेवा, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून देहू परिसरात सध्या भक्तीमय वातावरण आणि उत्साहाचे चित्र पाहायला मिळत आहे.















