- महिलांनी सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याची गरज : पोलीस निरीक्षक निता गायकवाड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २० जून २०२६) :- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या गंगानगर-प्राधिकरण शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला व महाविद्यालयीन तरुणींनी सहभाग घेतला. प्रमुख पाहुण्या म्हणून निगडी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक निता गायकवाड उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना गायकवाड म्हणाल्या की, सध्याच्या धावत्या शहरी जीवनशैलीत महिला मोठ्या प्रमाणात कामानिमित्त व कौटुंबिक कारणांसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे वाहन चालविताना व प्रवास करताना स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुचाकीस्वार महिलांनी हेल्मेटचा वापर करावा तसेच वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, माजी नगरसेविका वृषाली मोरे, अनुप मोरे, विजय मुनोत, शिल्पा हेरलगी, रुपाली भालेराव, गौरी सरोदे, राम सुर्वे, विशाल शेवाळे, संतोष चव्हाण, उद्धव कुंभार, धीरज नारखेडे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्याध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील तसेच पत्रकार नंदू साळुंखे उपस्थित होते.
यावेळी शैलजा मोरे व निता गायकवाड यांच्या हस्ते तक्रार पेटी आणि प्रथमोपचार पेटीचे उद्घाटन करण्यात आले. शैलजा मोरे यांनी महिलांनी एकत्र येऊन परिसराच्या सुरक्षेसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
डॉ. विजयकुमार पाटील यांनी नागरी समस्या सोडविणे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी महिला व युवतींचा वाढता सहभाग पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुहास करडे, अनुराधा वाघचौरे, तेजस सकट, उमेश देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल शेवाळे यांनी केले.















