न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. २२ जून २०२६ :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांगवी-पिंपळे गुरव मंडलाच्या वतीने राजमाता जिजाऊ उद्यान येथे रविवारी भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिंचवडचे आमदार Shankar Jagtap यांनी नागरिकांसोबत योगासने करून निरोगी जीवनाचा संदेश दिला.
कार्यक्रमात बोलताना आमदार जगताप म्हणाले की, शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. वाढत्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर मुलांना शालेय स्तरापासून योगाचे शिक्षण देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लहान वयात योगाची सवय लागल्यास एकाग्रता वाढण्यास मदत होऊन भविष्यातील अनेक आरोग्यविषयक समस्या टाळता येतील, असेही त्यांनी नमूद केले.
नगरसेवक शशिकांत जगताप, श्याम जगताप, ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, नगरसेविका पल्लवी महेश जगताप यांच्या पुढाकाराने आयोजित शिबिरात योगशिक्षक मीना पवार यांनी प्राणायाम व विविध योगासनांचे मार्गदर्शन केले. शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नियमित योगाभ्यासाचा संकल्प केला.















