- आरएससीओइच्या ९० टक्के विद्यार्थ्यांना ऑफर लेटर : प्राचार्य डॉ. आर. के. जैन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- औद्योगिक व बांधकाम क्षेत्रात मंदीचे सावट असतानाही राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात नव्वद टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस सिलेक्शनमधून प्लेसमेंटव्दारे ऑफर लेटर देण्यात आले. यामध्ये मेकॅनिकल विभागाच्या प्रफुल्ल भूजबळ आणि आयटी विभागाचा हर्षद श्रीवास्तव यांना मुंबईतील जारो एज्यूकेशन या कंपनीत प्रत्येकी बारा लाखांचे पॅकेज तसेच संगणक विभागाच्या केशव भारव्दाज व करण ज्योत सिंग यांना टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस मध्ये डिजिटल हायरिंग अंतर्गत सात लाखांचे पॅकेज देण्यात आले, अशी माहिती आरएससीइओचे प्राचार्य डॉ. आर. के. जैन यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या (जेएसपीएम) राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय (आरएससीओइ) अभियांत्रिकीमध्ये एकूण ७२० विद्यार्थी मागील शैक्षणिक वर्षात होते. त्यापैकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागांतर्गत घेण्यात आलेल्या प्लेसमेंटमध्ये मेकॅनिकल विभाग २५०, सिव्हिल विभाग ३० व इतर विभागाचे ३६८ अशा एकुण ६४८ विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांचे ऑफर लेटर देण्यात आले.
या महाविद्यालयात मागील तीन वर्षात २१ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज विद्यार्थ्यांना मिळवून देण्यात या विभागाने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यामध्ये केपीआयटी, इन्फोसीस, कॉन्टीनेंटल ऑटोमोटीव्ह, टीसीएस डिजिटल, टीसीएस कोड व्हिटा, टीसीएस, विप्रो, हॉटेल ओबेरॉय, बॉस, ॲमेझॉन, एल ॲण्ड टी इन्फोटेक, किर्लोस्कर चिलर्स, झेन्सार, पिनक्लिक, झेडएफ कॉन्टीनेंटल, गो स्पीडी, अचल इंडस्ट्रिज, पूना इलेव्हेटर्स, फिनसर्व्ह, हायर, यार्डी हुडी, फ्लेक्स, वोडाफोन आदी कंपन्यांचे ऑफर लेटर देण्यात आले.
या कॅम्पस सिलेक्शनमध्ये बांधकाम, उत्पादन, ऑटोमोटीव्ह, सिमेंट, सिव्हिल इंजिनिअरिंग, कोअर मॅन्यूफॅक्चरिंग, कोअर मॅकेनिकल, आयटी तंत्रज्ञान, तसेच आयटी प्रॉडक्ट, आयटी सर्व्हिसेस, मार्केटींग, टेलिकॉम, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट क्षेत्रातील कंपनीच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. जेएसपीएमचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. तानाजी सावंत, कार्यकारी संचालक सुधीर भिलारे, रवी सावंत यांच्या मार्गदर्शनाने प्राचार्य डॉ. आर. के. जैन आणि ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रा. संतोष बोर्डे यांनी टीसीएस कंपनीबरोबर जपानी भाषा शिकविण्यासाठी आणि झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीबरोबर ३०० विद्यार्थ्यांना २५० तासांचे प्रशिक्षण देण्याचा तसेच सिव्हिल बेन्टली सिस्टिम्स, मॅन्यूफॅक्चरींग सोल्यूशन्स लि.- टीएएल या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केले आहेत. याचादेखील विद्यार्थ्यांना कौशल्यवाढीसाठी व उद्योग व्यवसायासाठी लाभ होईल, अशीही माहिती संस्थेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे. जेएसपीएमचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी यशस्वी विद्यार्थी व ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागाचे अभिनंदन केले.















