न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामामध्ये ‘अजितसृष्टी’ प्रकल्पाचा समावेश करून दोन्ही प्रकल्पांचे एकत्रित लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या पत्रात लांडगे यांनी नमूद केले आहे की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याची स्मृती जपण्यासाठी प्रशासकीय भवनाच्या आवारात ‘अजितसृष्टी’ उभारण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय भवनाच्या दुसऱ्या टप्प्यातील निविदेमध्ये या प्रकल्पाचाही समावेश करावा.
अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत, त्यांच्या कार्याचा इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘अजितसृष्टी’ आवश्यक असल्याचे लांडगे यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.















