न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- शहरातील दररोज १०० किलोहून अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, मंगल कार्यालये, वसतीगृहे व आस्थापनांनी ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःच्या आवारात लावावी, अन्यथा १ जुलैपासून कचरा उचलला जाणार नाही, अशी भूमिका पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतली होती. मात्र, या निर्णयाला सोसायटीधारकांचा तीव्र विरोध झाल्यानंतर आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून हस्तक्षेप केल्यानंतर प्रशासनाने तूर्तास माघार घेतली आहे.
आमदार जगताप यांनी १८ जून रोजी दिलेल्या पत्रात अनेक गृहनिर्माण संस्थांकडे आवश्यक तांत्रिक सुविधा, माहिती व आर्थिक तरतूद नसताना दंडात्मक कारवाई करणे योग्य नसल्याचे नमूद केले होते. तसेच संबंधित घटकांची संयुक्त बैठक घेऊन जनजागृती मोहीम राबविण्याची मागणीही त्यांनी केली होती.
दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील १,१९५ मोठ्या आस्थापनांचे सर्वेक्षण सुरू केले असून, सध्या सोसायट्यांचा ओला कचरा महापालिकेकडून उचलला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शहरातील लाखो सोसायटीधारकांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे.
















