- पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जीएसटी कस्टम, पुणे विभागाच्या सहाय्यक आयुक्त दामिनी दिवाकर (आयआरएस) उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया होते. यावेळी मंचावर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सीए डॉ. अशोककुमार पगारिया, कार्याध्यक्ष विजय भिलवडे, महामंत्री संदीप फुलफगर, निवर्तमान अध्यक्ष उमेश पाटील तसेच जीएसटी अधीक्षक देवेंद्र बाकलीवाल उपस्थित होते.
या समारंभात ९९ टक्क्यांपासून ८० टक्क्यांपर्यंत गुण मिळविलेल्या ११० गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथी, महासंघाचे पदाधिकारी आणि जैन श्रावक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दामिनी दिवाकर म्हणाल्या, “नेहमी उच्च ध्येय मनाशी बाळगा आणि त्या ध्येयपूर्तीसाठी अथक परिश्रम करा. निश्चितपणे तुम्ही यशस्वी व्हाल. अपयशाने खचून न जाता पुन्हा उभारी घेऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करा. नक्कीच यश मिळेल, कारण ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’.”
महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “इरादा पक्का, हौसला बुलंद आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर काहीही अशक्य नाही. आपल्या आवडीचे ध्येय निवडा, त्या ध्येयाशी एकरूप व्हा आणि यशवंत व्हा.”
या कार्यक्रमाला महासंघाचे माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा, प्रा. प्रकाश कटारिया यांच्यासह जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप भन्साळी, नंदकुमार लुनावत, अशोक बागमार, विजय बलदोटा, सुभाष सुराणा, अनिता नहार, सौ. लता पगारिया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहाचे अध्यक्ष सुनील जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महासंघाचे पदाधिकारी श्रेणिक मंडलेचा, विरेश छाजेड, अभिनंदन छाजेड, तुषार मुथा, शुभम कटारिया, रुपेश बागमार, हर्षल लुंकड, सचिन कोगनोळे आणि हितेश सुराणा यांनी विशेष परिश्रम घेतले.
















