- आमदारांकडून अभिनंदन, तर खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे पर्यायी जागेची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ जुलै २०२६) :- ताथवडे येथील २० हेक्टर जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी हस्तांतरित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांमध्ये मतभिन्नता स्पष्ट झाली आहे. एकीकडे आमदार महेश लांडगे यांनी या निर्णयाचे स्वागत करून तो शहराच्या सुरक्षेसाठी ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी या जागेवरील ११ लाख झाडांचे संरक्षण करण्यासाठी पर्यायी जागेचा विचार करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आमदार लांडगे यांनी ताथवडे येथे आधुनिक पोलीस मुख्यालय, परेड ग्राऊंड आणि प्रशासकीय सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगत मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांचे अभिनंदन केले. या निर्णयामुळे शहराच्या सुरक्षा व्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा दावा त्यांनी केला.
मात्र, खासदार बारणे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाल्याचे नमूद करत, या परिसरातील पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याची चिंता व्यक्त केली. पोलीस आयुक्तालयाला जागा देण्यास विरोध नसला तरी यशदाला पूर्वी देण्यात आलेल्या जागेपैकी ५० एकर जागा आयुक्तालयासाठी देण्याचा पर्याय स्वीकारावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.
त्यामुळे एकाच निर्णयावर महायुतीतील दोन लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिका चर्चेचा विषय ठरत असून, विकास आणि पर्यावरण यामधील समतोल कसा साधला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.















