- आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही अस्पष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ०४ जुलै २०२६) :- रावेत परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून उडी मारून मृत्यू झालेल्या महिलेची ओळख अखेर पटली असून, ती व्यवसायाने डॉक्टर असून तिचे नाव डॉ. श्वेता तुळशीराम रोकडे (वय २९) असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला अज्ञात महिलेने इमारतीवरून उडी घेतल्याची माहिती समोर आली होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तिची ओळख निश्चित केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. श्वेता रोकडे या रावेत येथील सेलेस्टीयल सोसायटीमध्ये मैत्रिणीसोबत राहत होत्या. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्या जवळील ऑस्ट्रिया रॉयल्स या २४ मजली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत गेल्या. काही वेळातच एका महिलेने इमारतीवरून उडी घेतल्याचे सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर रावेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविला.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला काम मागण्याच्या बहाण्याने इमारतीत प्रवेश केल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे सुरुवातीला तिची ओळख पटू शकली नव्हती. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर मृत महिला डॉ. श्वेता रोकडे असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. त्यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचा तपास रावेत पोलीस करीत आहेत.
















