न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०४ जुलै २०२६) :- काळेवाडी परिसरातील तापकीर चौक येथे शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत भीषण वाहतूक कोंडी झाली. खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस, अवजड वाहने आणि अनियंत्रित वाहतुकीमुळे संपूर्ण चौक ठप्प झाला असून हजारो नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
तापकीर चौक हा काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, वाकड आणि पुणे-मुंबई महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र दररोज संध्याकाळी खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस प्रवासी चढ-उतार करण्यासाठी चौकातच थांबत असल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. आज तर परिस्थिती इतकी गंभीर झाली की अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
विशेष बाब म्हणजे, तापकीर चौकापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर असलेल्या थेरगाव येथील रुग्णालयाकडे जाणाऱ्या अनेक रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्या. वेळेवर उपचार मिळण्यात अडथळा निर्माण झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, ट्रॅव्हल्स बसेसना निश्चित थांबा नसल्यामुळे त्या रस्त्यावरच उभ्या राहत आहेत. त्यातच पावसामुळे आणि अवजड वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनली आहे.
नागरिकांनी वाहतूक पोलिस, महापालिका प्रशासन आणि आरटीओ विभागाने तातडीने हस्तक्षेप करून तापकीर चौकातील ट्रॅव्हल्स बसेसवर नियंत्रण आणावे, स्वतंत्र बस थांबा उभारावा आणि रुग्णवाहिकांसाठी विशेष मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.
“तापकीर चौकातील वाहतूक कोंडी आता जीवघेणी ठरत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते.”
– विवेक मल्हारी तापकीर उपाध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट…















