न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. ०४ जुलै २०२६) :- आळंदी येथे भरधाव कारखाली चिरडून दोन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३० जून रोजी घडली. या प्रकरणी कारचालक असलेल्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश कोकणे (वय २६) यांच्या कारची धडक लागल्यानंतर श्रुतिका मिरासे (वय २) ही कारच्या पुढील व मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी त्याचा पाठलाग करून चिंबळी फाट्याजवळ अडविले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी सांगितले की, संबंधित गुन्हा जामीनपात्र असल्याने आरोपीला तात्काळ अटक करता येत नाही. त्याला नोटीस बजावण्यात आली असून तो तपासात सहकार्य करीत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आवश्यक अहवालासह आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
















