न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ जुलै २०२६) :- विधानसभा मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने अध्यापनावर परिणाम होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने काही शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार एका शिफ्टमध्ये चालणाऱ्या २० ते २२ शाळांची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ ऐवजी सकाळी ७ ते दुपारी १२ अशी करण्यात आली आहे. हा बदल २ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी सांगितले की, शिक्षक बीएलओची जबाबदारी पार पाडत असतानाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद ठेवू नयेत, अशा सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, दोन शिफ्टमध्ये चालणाऱ्या महापालिका शाळांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
















