न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी प्रतिनिधी :- पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाचा शालांत परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाटयगृह येथे पार पडला.
यावेळी कार्यक्रमास महापौर, राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, शिक्षण समिती सभापती, सोनाली गव्हाणे, प्रभाग अध्यक्षा, अनुराधा गोरखे, महिला व बाल कल्याण समिती सभापती, स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समिती सभापती, सीमा चौगुले, नगरसेविका शर्मिला बाबर, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक व शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी ९० ते १०० टक्के गुण प्राप्त केलेल्या एकूण २० विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये, ८० ते ८४.९९ टक्के गुण प्राप्त करणा-या एकूण ६० विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, ८५ ते ८९ .९९ टक्के गुण प्राप्त केलेल्या एकूण ३४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये व दिव्यांग १२ विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी ५० हजार रुपये बक्षीस देवून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे, आई, वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन घेऊन पुढील आयुष्यात त्यांनी केलेल्या उपकारांचे पांग फेडावे व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवून आपल्या कुटुंबाचे व आपल्या पिंपरी-चिंचवड शहराचे नाव मोठे करावे असे महापौर राहुल जाधव विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी केले. तर सूत्रसंचालन नरेंद्र बंड यांनी केले. आभार नंदिनी बांदल यांनी मानले.














