न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- धनिकांच्या एनपीए खात्याची तूट भरुन काढण्यासाठी बँका सामान्य ग्राहकांवर वेगवेगळे शुल्क लादत आहे. त्यांच्या खात्यातून काही रक्कम कपात केली जात आहे. ही कपात म्हणजे बँक ग्राहकांवर अन्याय आहे. ही लूट थांबवावी अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासाठी संघटनेने त्यांना ३२०० पोस्ट कार्ड पाठविली आहेत. कष्टकरी संघर्ष महासंघतर्फे बँक शुल्काचा विरोध करण्यात आला. बचत खात्यावरील अन्यायकारक शुल्क रद्द करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
मागील आर्थिक वर्षात काही प्रमुख खासगी बँका आणि २१ सार्वजनिक बँकानी केवळ न्यूनतम रक्कम न ठेवल्याच्या दंडातून पाच हजार कोटी जमा केले आहेत. राज्यातील बँका, विविध बँकिंग व्यवहारावर ग्राहकांना मोठे शुल्क आकारत आहे. आधीचे प्रचलीत दर सोडून नव्याने अनेक दर, आकारणी केली जात आहे, असे या पत्रात म्हटले आहे.















