न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- स्वच्छता अभियान केवळ नावाला असून सर्वप्रथम सत्ताधारी पक्षाने गांधी जयंतीच्या निम्मिताने पारदर्शक कारभाराचे जनतेला दिलेले आश्वासन आमलात आणावे, असा टोमणा पिं. चिं. मनपाचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भाजपला लगावला.
यावेळी दत्ता साने म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी व परिसरात कचऱ्याचे ढीगच-ढीग साचले असून अनेक ठिकाणी कचरागाडी वेळेत पोहचत नाही. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शहरातील अनेक प्रभागातील कचरा वेळच्या वेळी उचलला जात नाही.
कचरावेचक कर्मचारी शहरातील अनेक भागात डोर-टू डोर न जाता कॉलनीतील मुख्य प्रवेशद्वारापाशी नागरिकांना बोलावून कचरा संकलन करतात, त्यामुळे कचरा रस्त्यावर जमा होऊन अस्वच्छता पसरली जाते या बाबींकडे प्रशासन व सत्ताधारी पक्षाचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे.
मागील स्थायी समितीने कचरा संकलनाचे काम दोन विभागात करून वाढीव दराने मंजूर केले, ऐनवेळी राष्ट्रवादीने विरोध केला तेव्हा कुठे दर कमी केला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना स्वच्छतेचा जास्तच पुळका आला असून केवळ सेल्फी काढण्याकरिता सत्ताधारी पक्ष गांधी जयंतीचे निम्मित साधत आहे. जो परिसर सुरुवातीपासूनच स्वच्छ आहे तिथे रिकामा झाडू फिरवत असल्याचे दत्ता साने म्हणाले.











