- बदल्यांबाबत राबविला अनोखा फंडा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- आई-वडील वयोवृध्द आहेत, त्यांची काळजी घ्यावी लागते, मुलाच्या शिक्षणास अडचणी येत आहेत. माझ्या वैद्यकीय अडचणीमुळे बदली हवीय, माझ्या घरापासून पोलिस ठाणे जाण्या-येण्यास खुप लांब आहे, अशा विविध कारणांनी पोलिस कर्मचा-यांनी बदलीचे अर्ज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल केले होते. तसेच त्याच्या पाठपुराव्यासाठी ते कर्मचारी सतत पोलिस आयुक्तालयात हेलपाटे मारत होते.
यावर रामबाण औषध शोधत, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पज्ञनाभन यांनी बदल्यांबाबत आज मंगळवार (दि. १८ जून) रोजी पोलिस कर्मचा-यांचा दरबार आयोजित केला होता. आयुक्त पज्ञनाभन यांनी पोलिस कर्मचा-यांच्या बदलीबाबत अर्ज मागवून, त्यांना एकत्रित बोलविले. कोणा-कोणाला कुठे कुठे? नियुक्ती पाहिजे, याविषयी इच्छुक स्थळे मागविले. त्या बदलीसाठी कारणेही विचारली. त्यानुसार सर्वांना पोलिस ठाणे व चौकीतील रिक्त पदे, व त्यांच्या आवश्यकतेनुसार बदलीचे धोरण स्विकारत, आयुक्त यांनी जवळपास ६०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या.
आर. के. पज्ञनाभन म्हणाले की, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यालयातंर्गत नव्याने स्थापन झालेल्या पोलिस चौकी आणि पोलिस ठाण्यात शेकडो पदे रिक्त आहेत. त्या जागेवर आपली बदली व्हावी, याकरिता खात्यांर्तगत पोलिस कर्मचा-यांनी प्रशासकीय अर्ज विनंत्या केल्या होत्या. त्यानुसार तब्बल सहाशेहून अधिक पोलिस कर्मचा-यांचे अर्ज पोलिस आयुक्तालयात प्राप्त झाले होते. त्यानुसार बदलीबाबत पोलिस कर्मचा-यांचा दरबार घेण्याचे ठरले. त्यात तीन वर्षे झालेले बदलीची कारणे विचारुन सर्वासमक्ष बदल्या करण्यात आल्या. मात्र, जिल्हातंर्गत बदली झालेल्या कर्मचा-यांना मुख्यालयात ठेवून त्यानंतर बदल्या करण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांना मनाप्रमाणे बदल्या मिळाल्यामुळे आता प्रशासन गतिमान होण्यास अधिक मदत मिळेल व कारभारात सुसूत्रता येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त पज्ञनाभन यांनी दिली.











