न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवार (दि. १८) रोजी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, पंकज भालेकर, शाम लांडे, प्रवीण भालेकर, नगरसेविका वैशाली काळभोर, सुमन पवळे, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, सुलक्षणा धर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवकाध्यक्ष विशाल वाकडकर, सरचिटणीस फजल शेख, कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे व आदी उपस्थित होते.
सदरची घटना घडून पंधरा दिवस उलटले तरी, अद्यापही या घटनेच्या मुख्य सूत्रधाराला पोलीसांनी अटक केलेली नाही. या सूत्रधाराचा दादागिरीच्या जोरावर सर्वसामान्यांचा, अन्यायाविरुद्धचा आवाज दडपून टाकून, समाजामध्ये दहशत पसरवून, एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या भ्याड हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे, अशा भावना पक्षाच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आल्या.











