न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिं. चिं. मनपाचे प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र अखेर रद्द झाले. त्यांनी चिखली प्रभाग क्रमांक १ मधून अनुसूचित जातीकरीता राखीव प्रवर्गातून महापालिकेची निवडणूक लढवली होती.
बुलढाणा जिल्हा जात पडताळणी समितीने २९ सप्टेंबर २०१८ रोजी हा निकाल दिला असून, यात गायकवाड यांचा अनुसूचित जातीत समावेश होणाऱ्या कैकाडी जातीचा दावा समितीने अमान्य केला आहे. तसेच खोटे आणि बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी समितीने कुंदन गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
कुंदन गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी नितीन दगडू रोकडे यांनी कुंदन गायकवाड हे अनुसूचित जातीत मोडत नसल्याची हरकत घेतली होती. त्यामुळे महानगर पालिकेला प्रभाग क्रमांक १ च्या ‘अ’ जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागणार असून या निकालामुळे इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.











