न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- शिवसेनेचा वर्धापन दिन व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, आज बुधवार (दि. १९) रोजी शिवसेनेच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या युवती सेना अधिकारी शर्वरी जळमकर यांनी अनोखा उपक्रम राबविला.
रहाटणी परिसरातील इयत्ता ७ वीत शिकणाऱ्या साक्षी कांबळे या विद्यार्थिनीचा वार्षिक शिक्षणाचा खर्च व शैक्षणिक वर्षाची सर्व जबाबदारी स्वीकारत, त्या मुलीच्या घरी जाऊन, त्या मुलीच्य आईला त्यांनी आश्वासित केले. साक्षीचे वडील हयात नाहीत. मुलीची आईही धुण्या-भांड्याचे काम करते. एकूणच साक्षीच्या घरची परिस्थिती बेताची आहे. अशा परिस्थितीत तिच्या शिक्षणाचा खर्च मुलीच्या आईला पूर्ण करणे अशक्य होते. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेच्या युवती सेना अधिकारी शर्वरी जळमकर यांनी साक्षीच्या शिक्षणाची जबाबदारी घेत अनोखा पायंडा रचला.
याप्रसंगी युवतीसेनेच्या अमृता सुपेकर, सावली शिंदे, क्रांती शिंदे तसेच महिला आघाडी वाल्हेकरवाडी उपविभागाच्या सारिका शिंदे व सर्व युवती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













