न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- पुण्यातल्या तेलगी स्टॅम्प पेपर घाेटाळ्याने सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले असताना आता पुन्हा एकदा पुण्यात स्टॅम्प घाेटाळा उघडकीस आला आहे. काेषागार अधिकारी प्रथम मुद्रांक लिपीक काेषागार पुणे करीता असा बनावट शिक्का तयार करुन ताे १०० आणि ५०० च्या स्टॅप्म पेपरवर उमटवून त्याचा गैरवापर केल्याची घटना समाेर आली आहे. याप्रकरणी पुण्यातील कसबा पेठेत राहणाऱ्या देशपांडे कुटुबिंयांना पाेलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाबाबत पाेलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली हाेती. पाेलिसांनी देशपांडे यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता हा प्रकार समाेर आला. या प्रकरणी विश्रामबाग पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी चिन्मय सुहास देशपांडे (वय २६), सुहास माेरेश्वर देशपांडे (वय ५९), सुचेता सुहास देशपांडे (वय ५४, सर्व रा. पारसनीसवाडा, कसबा पेठ) यांना अटक केली आहे.
पाेलिसांनी शनिवार पेठेतील दुकानातून तसेच बुधवार पेठेतील लाल महाल समाेर असणाऱ्या कमला काेर्ट या इमारतीच्या देशपांडे व्हेंडर या कार्यालयातून ६८ लाख ३८ हजार १७० रुपयांचे बनावट शिक्के मारलेले स्टॅम्प पेपर जप्त केले आहेत. देशपांडे कुटुंबियांना कुठलाही अधिकार नसताना वरिष्ठ काेषागार अधिकारी प्रथम मुद्रांक लिपीक काेषागार पुणे करीता असा शिक्का त्यांनी तयार केला हाेता. ताे शिक्का १०० व ५०० रुपयांच्या स्टॅप्म पेपरवर उमटवून त्यावर सही करुन त्या स्टॅम्प पेपर्सचा गैरवापर करण्यात येत हाेता.













