- कंत्राटी कर्मचाऱ्याच्या जीवाला कोण वाली?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० ऑगस्ट २०२६) :- महापालिकेच्या कासारवाडी येथील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीवरून पडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राहुल विठ्ठल साबळे (वय ४३, रा. विजयनगर, काळेवाडी) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर संबंधित ठेकेदार पार्वती इलेक्ट्रिक एंटरप्रायजेसला महापालिकेच्या विद्युत विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महिला आयटीआयच्या इमारतीत ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय कार्यरत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त इमारतीवर लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईच्या माळा काढण्याचे काम सुरू असताना मंगळवारी (दि. १८) दुपारी दीड ते दोनच्या सुमारास राहुल साबळे गच्चीवरून खाली पडले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, हे काम सुरू करण्यापूर्वी विद्युत विभागाची आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. तसेच, विभागातील कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली होती का, याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणात सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत विद्युत विभागाने ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. ठेकेदाराला २४ तासांत आपला खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खुलासा समाधानकारक नसल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहशहर अभियंता महेश कावळे यांनी दिला आहे.
संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करून भविष्यात निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध का करण्यात येऊ नये, अशीही विचारणा नोटीसमध्ये करण्यात आली आहे. मात्र, एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा जीव गेल्यानंतरही अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नसल्याने महापालिका प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरक्षेतील निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून, या प्रकरणात दोषींवर नेमकी काय कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.


















